नेरळ : नेरळ कळंब राज्यमार्गावर एका चारचाकी वाहनाने दुचाकी आणि हातगाडीला धडक दिली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाडी येथील व्यक्ती गंभीर जखमी झाली तर आणखी एक मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला. मात्र या मध्ये मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्गावर शनिवार 13 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास हा अपघात घडला. पुणे येथील पर्यटक हे नेरळ साईमंदिर परिसरातून जात असताना चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट वाहन रस्त्याच्या कडेला असणार्या हातगाडीला व एका मोटार सायकलला धडकली. एमएच 12 क्युटी 1511 ह्या क्रमांकाची सफेद रंगाची टाटा कंपनीची नेक्सन कार होती. पुणे येथून आलेले हे पर्यटक नेरळ कळंब दिशने जात होते. दरम्यान कार मधील चालकाला झोप लागली असता कार वरील चालकांचे नियंत्रण सुटले आणि कार थेट विरुद्ध दिशेला जावून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जूस विक्रेत्या हातगाडीला ठोकर दिली. सोबतच समोरून येणार्या एका स्कुटीचालकाला देखील या कारची जोरात धडक बसली. या धडकेत मात्र मोटारसायकलस्वार थोडक्यात बचावला. हातगाडीवरील विक्रेता तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमोल पाटील हे हजर झाले होते तर स्थानिकांच्या मदतीने पाटील यांनी जखमीला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता हलवले व नंतर पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथे हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.