
संगमेश्वर : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ फाटा येथे रविवारी संध्याकाळी पाच वाजता ट्रॅव्हल्स बस आणि डंपरचा अपघात झाला. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २१ प्रवासी किरकोळ जखमी असून, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कडवई येथे रस्त्याचे काम करणाऱ्या ए. आर. कन्स्ट्रक्शन कंपनीचा डंपर चालक अपघातानंतर चालू गाडी सोडून पळून गेला. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक रखडली. दोन्ही बाजूला अकरा ते बारा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर रात्री नऊ वाजता ग्रामस्थ, रिक्षा व्यावसायिकांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॅफिक सुरळीत केली.
कोपरखैरणे येथून गणपतीपुळे येथे आलेले भक्तगण खासगी आरामबसने (एमएच ४३ सीई ४२९३) परतीच्या मार्गावर होते. तुरळ फाटा येथे त्या बसच्या पुढे असलेल्या डंपरचालकाने (एमएच १२ डब्ल्यू जे ४७५१) उजव्या बाजूला वळताना इंडिकेटर दाखवला नाही. अचानक गाडी उजव्या बाजूला वळवल्याने आरामबस डंपरच्या मागे जाऊन जोरात धडकली. बसच्या पुढच्या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचालकासह २१ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.