
रत्नागिरी – मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर २२ मार्च रोजी रात्री पालीनजीक बांबर फाट्याजवळ महामार्गावर बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या स्वाराचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पाली ग्रामीण रुग्णालयाच्या पुढील बाजूला चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या नवीन महामार्गावर खडी वाहतूक करणारा डंपर (क्रमांक जीजे १२ बीझेड ४२४८) बंद पडल्याने चालक राहुल यादव याने रस्त्यावरच उभा करून ठेवला होता. याचदरम्यान रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान पालीवरून खानूच्या दिशेने एक्टिवा दुचाकी क्रमांक एमएच ०८ एडी ३५४० घेऊन संदीप भिवा सुवारे (वय ४५, रा.खानू, ता.जि.रत्नागिरी) ही व्यक्ती या बंद पडलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडकली. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कांबळे, मोहन कांबळे यांनी जाऊन जखमीला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. या अपघातामध्ये डोक्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना प्रथम उपचारासाठी नजीकच्या पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन अधिक उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान ते मृत झाले.
या अपघातामध्ये दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबलेली होती. या अपघातात मयत झालेला संदीप सुवारे हे सेंट्रींगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत. अपघाताची खबर डंपर चालक राहुल डोमी यादव रा. बगडी ईसापुर, भागलपूर, राज्य बिहार, सध्या रा.नाणिज,रत्नागिरी यांनी दिली असून अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.