
मुंबई- 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील संशयित आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेतील कोर्टाने भारताच्या प्रत्यापणाच्या विनंतीला मान्यता दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. जो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला असून भारताच्या विनंतीला समर्थन दिलं होतं.
जुन २०२० भारताच्या विनंत्तीवर राणाला अमेरिकेत तात्पुरती अटक झाली होती. राणा हा 26/11 चा आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीचा बालमित्र आहे. हेडली हा लष्कर ए तय्यबाशी जोडलेला असल्याची माहिती होती. तसेच त्याच्या कृत्यांसाठी राणाने मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे. हेडलीच्या मीटिंग तसेच हल्ल्याचं संपूर्ण प्लॅनिंग याची माहिती राणाला असल्याचा संशय आहे. पाकिस्तानी मूळ असलेला राणा कॅनडियन बिझनेसमॅन आहे. 26/11 च्या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता त्यातील सहा अमेरिकन होते. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरू होते.
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी युक्तिवाद केला की राणाला माहित होतं की त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी-अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होता. त्यामुळे त्याने हेडली, दहशतवादी संघटना आणि त्याचे सहकारी यांच्या कारवायांमध्ये मदत केली आणि बचावही केला. भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारताकडे प्रत्यार्पण हे पूर्णपणे कराराच्या अधिकारक्षेत्रात होते, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. या हल्ल्यामध्ये दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता, त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी भारतात फाशी देण्यात आली होती. तर उर्वरित दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांनी ठार केले होते.