एक दाढीवाला दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला:दिघेंचे हिंदुत्व अन् शिंदेंच्या बंडाची कथा, बहुप्रतिक्षित धर्मवीर 2 चा ट्रेलर रिलीज…

Spread the love

मुंबई- एक दाढीवाला, दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला. अशा डायलॉगसह बहुप्रतिक्षित धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक हा दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता क्षितिज दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.

येत्या 9 ऑगस्ट रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…

आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे. यापूर्वीच या चित्रपटाचा टिझर देखील रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. खरे तर धर्मवीर चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर धर्मवीर 2 ची घोषणा करण्यात आली होती. आता अखेर ही प्रतीक्षा संपली असून येत्या 9 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत झाला ट्रेलर लाँच…

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा शनिवारी पार पडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवुडस्टार सलमान खान, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी “धर्मवीर – 2” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे.

मीही चित्रपट काढेल तेव्हा अनेकांचे चेहरे समोर येतील- फडणवीस…

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेब काम करत आहेत. महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील. विचारांशी गद्दारी झाली म्हणून ते सरकारमधून बाहेर पडले. त्यांना गद्दार म्हणून हिणवले गेले. पण त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे. धर्मवीर 2 ट्रेलर आपण पाहिला आहे. यामुळे मला देखाली आता चित्रपट काढायचा आहे. पण मी जेव्हा चित्रपट काढेन त्यावेळी अनेकांचे खरे चेहरे समोर येतील”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन चित्रपट काढला नाही- शिंदे

तसेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढलेला नाही असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतले आहे. तो म्हणजे 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला आहे.

हिंदीतही प्रदर्शित होणार चित्रपट…

तसेच धर्मवीर-2 सिनेमा हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही,तर संपूर्ण देशभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लाँच करण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने उपस्थिती लावली. यावेळी अवघ्या दोनच शब्दांत सलमानने या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. मी पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगलाही उपस्थित होतो, तो सुपरहिट झाला. हा चित्रपट देखील हिट व्हावा अशा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र असे सलमान म्हणाला

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page