▶️ या आधीही १ कोटी ८० लाखाचे दान
पंढरपूर ,02 मे 2023 –
पंढरपूरच्या विठुराया चरणी पुन्हा कोटींचे दान मिळाले आहे. जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पंढरीनाथाच्या चरणी तब्बल दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. या महिला भक्ताने काही दिवसापूर्वी विठुरायाला पावणे तीन किलो सोन्याचे आणि चांदीचे दागिने अर्पण केले होते. पुन्हा त्याच महिला भक्ताने दोन किलो सोन्याचे दागिने अर्पण केल्याने विठुरायाच्या खजिन्यात वाढ झाली आहे.
जालन्याच्या या भक्ताकडून काही दिवसापूर्वी १ कोटी ८० लाखाचे दान देण्यात आले होते. एकाच भक्ताकडून दुसऱ्यांदा मंदिरास असे सव्वा कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. सोमवारी मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकाने विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर, तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. हे दागिने मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यानंतर सदर दागिने देवाच्या चरणी अर्पण करून देवाला परिधान करण्यात आले.
याच महिला भाविकाने वसंत पंचमी दिवशी १ कोटी ८० लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते.