☯️ रिफायनरी प्रकल्प अजिबात रेटून न्यायचा नाही, २ किंवा ३ मे रोजी मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय
रत्नागिरी (प्रतिनिधी) : राजापूर बारसुचा रिफायनरी प्रकल्प अजिबात रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचे समाधान करून,. सगळ्यांच्या शंका दूर करून तिथले जे शेतकरी आहेत त्यांना न्याय देऊनच हा प्रकल्प आम्हाला पुढे न्यायचा आहे. २ किंवा ३ तरिखला मुंबईत याबाबत बैठक होईल, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी आज बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी खासदार विनायक राऊत, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री.प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, राजापूर उपविभागीय अधिकारी वैशाली माने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वंदना करमाळे आदि उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री सामंत प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, बारसू रिफायनरी बाबत काळ मला जो संदेश मिळाला होता की बारसु चे आंदोलक चर्चा करण्यासाठी तयार आहेत त्यानुसार आज तातडीने मी आलो. आज सर्वाँना त्याबाबत चर्चेची नोटीस दिली होती. बैठक पुन्हा किती तारखेला घ्यायची याबाबतही फोनवर चर्चा झाली.
एक गैरसमज पसरवला जात आहे की पोलीस बाळाचा वापर करून हे सर्व करीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी टेलिफोनीक चर्चा झाली मी सद्धा त्यांच्याशी बोललो. ज्या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती त्यांना कालच सोडून देण्यात आले होते. पुरुष मंडळींना ताब्यात ठेवण्यात आले होते. आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे असे म्हणणे होते त्यानुसार एक पाऊल नव्हे तर प्रशासनाने चार पावले पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासन ३५३ सारखे गुन्हे दाखल करणार आहे अशी चर्चा होती तसे काही नसल्याची खात्री आपण करून घेतली आहे, असेही सामंत म्हणाले.
महावितरण अधिकाऱ्याची बदली
दुसरा मुद्दा की त्या भागामध्ये ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यामध्ये काही अधिकाऱ्यांनीही जमिनी खरेदी केल्याचे खासदार आणि आंदोलक यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती सुद्धा नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक जमीन घेतलेली असेल तर ती कशा प्रकारे घेतली आणि घेतली याची दोन दिवसात चौकशी केली जाईल. आणि बेकायदा जमीन घेतलेली असेल तर त्यांना सस्पेंड करण्यापर्यंत कारवाई महाराष्ट्र सरकार करेल असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महावितरण अधिकाऱ्याच्या नावावर ही जमीन आहे, त्याची मुख्यालयात बदली करण्याचा निर्णय मी पालकमंत्री म्हणून घेतला आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.
रिफायनरी बाबत शासनाची सर्व संबंधितांशी चर्चेची तयारी आहे. माझी अनेक आंदोलकांशी चर्चा झाली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या सोबत जसे त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच अजित यशवंतराव हेदेखील या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी देखील तिथल्या लोकांशी संवाद साधलेला आहे. २ किंवा ३ तारिखला याबाबत मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय झाला आहे. तसेच काल मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जर काही ब्रिफिंग आवश्यक असेल तर त्यांची देखील वेळ घ्यावी अशी सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. जिल्हाधिकारी आजच त्यांच्याशी बोलतील. आयुक्त बोलतील आणि त्यांच्या शंकांचे जर काही निरसन करायचे असेल तर ती माहितीही आमचे अधिकारी उद्धवजी याना देतील. याबाबतचे ब्रिफिंग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनाही करण्यात आलेले आहे. आणखी विरोधी नेत्यांच्या शंका असतील तर त्यांचेही शंका निरसन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांना कुठेही त्रास देण्याचा प्रयत्न नाही. हे सर्वेक्षण आपण करतो आहोत. आज तर अजून एक गोष्ट मला कळली की जिथे बोअर मारतोय तिथे काँक्रिट टाकून पिलर उभे करतोय असाही एक गैरसमज आहे. हे फक्त सॉईल म्हणजेच मातीचे टेस्टिंग आहे. मातीचे परीक्षण झाल्यावर प्रकल्प येथे होणार की नाही यावर शिक्कामोर्तब होणार आहे. म्हणून आम्ही सर्वाँना आवाहन केले आहे. अतिशय संयमी अशी आजची बैठक झाली, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.