मागे दिलेल्या आमरण उपोषणाला प्रशासनाने गांभीर्याने घेतले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे जसजसा उपोषणाचा दिवस जवळ येऊ लागला तसे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दबाव आणण्याचा अयशस्वी प्रयत्नही करण्यात आला. मात्र मी झुकलो नाही. आणि जसे ठरवले तसे पंचायत समिती चिपळूणच्या आवारात आज प्रजासत्ताक दिनी कुटुंबासहित लाक्षणिक आमरण उपोषण केलेच.
यावेळी मला मोठ्या प्रमाणात पाठींबा विविध माध्यमांतून मिळाला. काही पक्षांचे पदाधिकारी माझी भेट घेऊन गेले. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे रत्नागिरी (उ.) जिल्हा समन्वयक श्री. शशिकांत वाघे यांनी मला संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. सोबतच भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी (उ.) जिल्हा उपाध्यक्ष श्री. रामदास राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या प्रयत्नांनी आणि पाठींब्याने इतके दिवस मला न्याय न देणारे आणि माझ्यावर उपोषणाचा मार्ग निवडण्याची वेळ आणणारे प्रशासन झुकले. आणि ग्रामपंचायत कुडप न.नं. २६ वर नोंद असलेला आणि बांधकाम विभाग, चिपळूण यांच्यामार्फत बनवलेल्या बिबवीचा कातळ ते देवशेतवाडी रस्त्याबाबत प्रत्यक्ष स्थळ पहाणी दि. १५ फेब्रुवारीच्या आत करण्याचे आणि बांधकाम विभाग तसेच कुडप ग्रामपंचायत यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून सदरबाबत चौकशी व चर्चा करण्यात येईल असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, चिपळूण यांनी दिले.
या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी मी व माझ्या कुटुंबाने सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेत आहे. यासाठी मला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. न्याय मिळेपर्यंत माझा लढा संपणार नाही हे याठिकाणी मी स्पष्ट करतो असा इशारा श्री. नितीश शिर्के यांनी दिला.