३०० रुपयांसाठी विद्यार्थ्यांकडून ३० वेळा घेतले लिहून
घोडबंदर रोड वरील `न्यू होरायझन’ शाळेतील शिक्षकाचा प्रताप;
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे आक्रमक

Spread the love

ठाणे : निलेश घाग

घोडबंदर रोड परिसरातील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका शिक्षकाने डायरी आणि ओळखपत्रांचे शुल्क यासाठी भरावयाच्या ३०० रुपयांसाठी सात ते आठ विद्यार्थ्यांकडून मी पैसे आणायला विसरणार नाही' हे वाक्य ३० वेळा लिहून घेतल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शाळा व्यवस्थापन आणि सदर शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. याबाबत शाळा प्रशासनाची भूमिका मात्र समजू शकलेली नाही. न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षकाने सुमारे सात ते आठ विद्यार्थ्यांना त्यांच्या डायरी आणि ओळखपत्रांचे शुल्क भरण्यासाठी असलेल्या अंतिम मुदतीची पालकांना आठवण करून देण्यासाठी 'मी ३०० रुपये आणण्यास विसरणार नाही' असे लिहिण्यास सांगितले. अशाप्रकारे विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष निलेश वैती यांनी सांगितले. या घटनेमुळे मुलांच्या बालमनावर परिणाम झाला असून दुसऱ्या दिवशी शाळेत मुले तयार नव्हती अशी माहिती वैती यांनी दिली. विशेष म्हणजे एका विद्यार्थिनीने अशाप्रकारे लिहिण्यास नकार दिला तेव्हाशिक्षिकेने तिला वर्गाच्या एका कोपऱ्यात उभे करण्याची शिक्षा देत लिहायला सांगितले’ अशी माहिती पालकांनी दिली. एका पालकाने शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या प्रकारची पोस्ट टाकल्यावर हा खळबळजनक प्रकारचा उलगडा झाला. त्यानंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिली, त्यानंतर काही पालकांनी उपमुख्याध्यापकांना फोन करून या प्रकारची माहिती दिली. उप मुख्याध्यापकांनी शिक्षकावर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मात्र या प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून कासारवडवली पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली आहे. या मागणीसाठी मनविसेकडून निषेध आंदोलनही करण्यात आले. यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष, जिल्हा सचिव अरविंद बाचकर, ठाणे शहर संघटक प्रमोद पत्ताडे, संदीप चव्हाण, उपशहर अध्यक्ष हेमंत मोरे, मयूर तळेकर, राकेश आंग्रे, दिपक शिंदे, विभाग सचिव तुषार सडके, अनिकेत शेंगोटे, मंदार पाष्टे, विभाग अध्यक्ष प्रसाद होडे, संकेत देवे, सागर वर्तक, उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश घुले, सिद्धेश शिंदे, सौरभ कांबळे, प्रसाद कुंभार, महाराष्ट्र सैनिक चेतन पांडव, प्रविण कराळे, आदी सहभागी झाले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page