देवरूख- राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) यांचेतर्फे नुकत्याच झालेल्या पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नोलॉजीला बी ++ श्रेणी देऊन गौरविण्यात आले आहे. नॅकच्या तज्ञ समितीच्या उपस्थितीत महाविद्यालयामध्ये हि पुनर्मुल्यांकन प्रक्रिया पार पडली.
महाविद्यालयामधील अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि संसाधने, अभ्यासक्रमांची निवड आणि अंमलबजावणी, परीक्षा पद्धती व विद्यार्थ्यांचे निकाल, शैक्षणिक व सहशैक्षणिक विभागातील महाविद्यालयाची कामगिरी, संशोधन कार्य व प्रकाशाने, प्रशासकीय सेवा सुविधा अशा अनेक गोष्टींची तज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून हे मुल्यांकन या परिषदेमार्फत केले जाते.
२०१७ साली महाविद्यालयाला पहिल्यावेळी “बी +” श्रेणी मिळाली होती. यावर्षी पाच वर्षाच्या विहित मुदतीनुसार महाविद्यालयाचे दुस-यावेळी पुनर्मुल्यांकन करण्यात आले.
त्यामध्ये महाविद्यालयाने ‘बी ++’ श्रेणी प्राप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
विशेषकरून कोकणातील विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण प्राप्त व्हावे या उदात्त हेतूने संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रवींद्र माने यांनी हे महाविद्यालय सुरु केले. महाविद्यालयाने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून या कालखंडामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे.
मुल्यांकनादरम्यान नॅक समितीने महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणारे विवध उपक्रम, कौशल्य विकास योजना, महाविद्यालयाचा निसर्गरम्य परिसर, सौर उर्जा निर्माण प्रकल्प, कॅम्पस प्लेसमेंट, तसेच महाविद्यालयाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दिमाखदार कामगिरी करणारी टीम एम एच ०८ , गो कार्ट डीझाइन चॅलेंज स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारी टीम फुल थ्रोटल या सर्व गोष्टींची विशेष दाखल घेऊन प्रसंसा केली. महाविद्यालयाच्या या यशामध्ये संस्थेचे संचालक मंडळ सदस्य, आजी व माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी या सर्वांचा सहभाग व परिश्रम कारणीभूत असून त्यामुळे महाविद्यालयाची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री मा. रविंद्रजी माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने यांनी प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.