
रत्नागिरी- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत रत्नागिरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयउभारण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशन मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्ड (MARB) ची मान्यता मिळाली आहे.
मान्यतेसंबंधीचे पत्र २६ एप्रिल रोजी वैद्यकीयमहाविद्यालयाचे डीन यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे रत्नागिरीत यावर्षापासून १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय (एमबीबीएस) महाविद्यालय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.रत्नागिरीत १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी मंत्री सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी यांच्यामार्फत १०० एमबीबीएस जागांसह नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची विनंती नॅशनल मेडिकल कमिशनकडे (एनएमसी) करण्यात आली होती.
वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने (MARB) १० जानेवारी २०२३ रोजी अहवालाचे परीक्षण केले. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची उपलब्धता, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृहे, रुग्णालय आणि प्राध्यापकांची उपलब्धता या निकषानुसार एनएमसीने २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठी एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता जाहीर केली आहे.या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहाणी मंत्री सामंत यांनी काही दिवसांपुर्वीच केली आहे. त्यामुळे आता या महाविद्यालयाला नॅशनल मेडिकल कमिशनची मंजुरी मिळाल्याने या वर्षापासून रत्नागिरीत १०० विद्यार्थ्यांचे वैद्यकीय (एमबीबीएस) महाविद्यालय होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता होण्याच्या दृष्टीने वेगाने कार्यवाही होणार आहे. दरम्यान, आपण जे मेडिकल काॅलेजचे स्वप्न बघितले ते आता साकार रूप घेत आहे. या मेडिकल काॅलेजला १०० विद्यार्थ्ंसाठी परवानगी मिळाली आहे. याचा अर्थ या वर्षापासून हे मेडिकल काॅलेज सुरू होत आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि केंद्र सरकार यांचे मी आभार मानतो, असे राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.