▶️ मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण

Spread the love

मुंबई- महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मॉरिशसमध्ये काल शुक्रवारी अनावरण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा आसमंत दुमदुमला.

छत्रपती शिवाजी महाराजांची ख्याती जगभर पसरली आहे. ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस आहे, त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. जगभरातील अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. आता, मॉरिशसमध्ये देशातील सर्वांत मोठ्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ उपस्थित होते. मॉरिशसमधील मराठी समुदायाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. उपस्थित मराठी बांधवांनी पारंपरिक महाराष्ट्र पद्धतीची वेशभूषा केली होती. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित बांधवांशी मराठीत संवाद साधला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवराय फक्त राजे नव्हते, ते द्रष्टे होते. त्यांनी ज्याप्रमाणे राज्यव्यवस्था घडवली त्यात कोणताही भेद नव्हता. कोणालाही विशेष दर्जा नव्हता. चूक करणाऱ्यांना शिक्षा होती, चांगलं वागणाऱ्याला प्रोत्साहन होतं. मॉरिशसमध्ये सुमारे ७५ हजार मराठी बांधव राहतात. यात प्रामुख्याने पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोकण भागातून गेलेले बरेच मराठीजन आहेत. त्यांनी आपल्या मराठी परंपरा, संस्कृती जोपासली आहे. या मराठी बांधवांच्या विविध सुमारे ५४ संघटना असून, या सर्व संघटनांचा मिळून १ मे १९६० रोजी मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन स्थापन करण्यात आले आहे. याद्वारे ‘महाराष्ट्र दिन’, ‘शिवजयंती’, ‘गुढीपाडवा’, ‘गणेश चतुर्थी’ मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मॉरिशसमध्ये एक महाराष्ट्र भवन सुद्धा उभारण्यात आले आहे.

मॉरिशसमध्ये मराठी बांधवांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारणी आणि विस्तार कार्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ कोटी रुपये देण्यास मान्यता दिली आहे. मॉरिशसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ए. गानू यांनी यांनी ८ मार्च २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी तसेच महाराष्ट्र भवनाच्या पुढील विस्तारासंबंधी आपला मनोदय व्यक्त केला होता. १४ फुट उंचीचा हा पुतळा फायबर ग्लास मिडीयममध्ये तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मॉरिशियमधील हा सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. नाशिक येथील शिल्पकार विकास तांबट यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी तीन महिन्यांचा अवधी लागला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page