देवरूख महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना ‘ग्लोबल फाऊंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

Spread the love

देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सपे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना ग्लोबल फाऊंडेशन मार्फत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे संपन्न झालेल्या ‘सार्क देशांमधील शाश्वत विकासाची उद्दिष्टे: समस्या, संधी आणि अडथळे’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा पुरस्कार श्रीलंकेतील केलान विद्यापीठातील भूगोलशास्त्राचे वरिष्ठ प्रा. डॉ. लाल यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

डॉ. सरदार पाटील ७ जानेवारी, २००९ रोजी आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि ७ जानेवारी, २०२२ पासून महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत शैक्षणिक, सामाजिक, संशोधन, आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये अनमोल योगदान दिले आहे. त्याचीच पोचपावती म्हणून डॉ. सरदार पाटील यांना महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेमार्फत सन २०१५ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले.

डॉ. पाटील यांनी सेवेत रुजू झाल्यानंतर २०१० साली शिवाजी विद्यापीठाची विद्यावाचस्पती पदवी मिळवली, सन २०१७ मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले, तर २०२० मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा जिओ इन्फॉर्मेटिक्स क्षेत्रातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उच्च दर्जासह पूर्ण केला. राष्ट्रीय दूर संवेदन संस्था देहराडून या संस्थेचा जिओ इन्फॉर्मेटिक्स फॉर अर्बन प्लॅनिंग हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०१५ साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगलोर यांच्या अनुदानातून पूर्ण केला आहे. याशिवाय दूर संवेदन, भौगोलिक माहिती, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांनी ८ अभ्यासक्रम उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीच्या कालावधीत पूर्ण केले आहेत.

डॉ. पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रम बदलांमध्ये देखील महत्त्वाचे योगदान दिले आहे. संशोधन क्षेत्रांमध्ये डॉ. पाटील यांचे २३ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण चार संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून, त्यांची एकूण तीन पुस्तके आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाली आहेत. डॉ. पाटील यांनी आतापर्यंत एकूण ४३ व्याख्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये दिली आहेत. कोकणामध्ये जिओ इन्फॉर्मेटिक्स या क्षेत्रात काम करणारे एक प्रमुख प्राध्यापक म्हणून सरदार पाटील यांची ओळख आहे. त्यांच्याच प्रयत्नातून महाविद्यालयाने जिओ इन्फॉर्मेटिक्स फॉर व्हिलेज रिसोर्स मॅपिंग हा कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.

डॉ. सरदार पाटील यांनी अतिशय रचनात्मक पद्धतीने एकूण २२० अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ बनवून ते युट्युबच्या माध्यमातून विद्यार्थी व अभ्यासकांना खुले करून दिले आहेत. डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यस्थितीत सहा विद्यार्थी पीएचडीसाठी संशोधन करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या व मुंबई विद्यापीठाच्यावतीने विविध महत्त्वांच्या समित्यांवर डॉ. पाटील कार्यरत आहेत. डॉ. सरदार पाटील यांच्या विविधांगी कार्याची दखल घेऊन ग्लोबल फाऊंडेशनने हा पुरस्कार दिल्याबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटो- ग्लोबल फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. लाल यांच्याकडून स्वीकारताना उपप्राचार्य डॉ. पाटील, इतर मान्यवर व कुटुंबीय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page