मुंबई ,28 एप्रिल-
एफएमसीजी मधील बलाढ्य म्हणून ओळखली जाणारी गोदरेज कंन्झ्युमर प्रॉडक्ट्स ही कंपनी रेमंडचा ग्राहक सेवा व्यवसाय विकत घेण्यासाठी करार करणार आहे. या दोन्ही कंपन्या कराराची औपचारिक घोषणा लवकरच करतील, असे सांगण्यात आले आहे.
पार्क अव्हेन्यू आणि कामसूत्र कंडोमसारख्या ब्रँडचे मालक असलेली रेमंडचा कंझ्युमर केअर व्यवसाय पर्सनल केअर, सेक्सुअल वेलनेस आणि होम केअर या श्रेणींमध्ये कार्यरत आहे. २०२२ पर्यंत ग्राहक सेवा व्यवसायात ४७.६६ टक्के हिस्सा असलेली रेमंड काही वर्षांपासून आपली एफएमसीजी शाखा विकण्याचा विचार करत होती. दोन कंपन्यांमध्ये एकमत झाले आणि करार निश्चित झाला तर तो सौदा १००० ते १२०० कोटी रुपयांचा असेल, असे या क्षेत्रातील तज्ञ असलेल्या लोकांनी सांगितले आहे. ही बातमी आल्यावर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये, रेमंडच्या शेअरची किंमत रु. वर ५.१० टक्क्यांनी वाढून १,६९४ रुपये झाली आहे.