रत्नागिरी (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना मुंबईतील विश्व संवाद केंद्राचा यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली.
विश्व संवाद केंद्रातर्फे उदयोन्मुख पत्रकारांसाठी कार्यशाळा, पत्रलेखकांसाठी वर्ग, सोशल मीडियाचा सामाजिक कार्यासाठी उपयोग, स्तंभलेखक कार्यशाळा आणि मूल्याधारित पत्रकारिता करणार्या पत्रकारांचा सन्मान असे अनेक उपक्रम राबविले जातात. देवर्षी नारद हे आद्य पत्रकार होते, अशी विश्व संवाद केंद्राची धारणा आहे. त्यामुळे प्रतिवर्षी नारद जयंतीला मूल्याधारित पत्रकारिता करणार्या माध्यम प्रतिनिधींचा अणि सोशल मीडियावर समाजहित डोळ्यांपुढे ठेवून लेखन करणार्यांचा सन्मान करण्यात येतो. सन्मान सोहळ्याचे यावर्षीचे बाविसावे वर्ष असून यावर्षीच्या सन्मानासाठी श्री. कोनकर यांची निवड झाली आहे. उदय निरगुडकर, दिनेश गुणे, किरण शेलार आणि मृणालिनी नानिवडेकर यांच्या समितीने ही निवड केली.
गेली ४४ वर्षे पत्रकारितेमध्ये असलेले श्री. कोनकर रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक, आकाशवाणी आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी आहेत. येत्या ३ मे रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री. कोनकर यांना सन्मानाचे वितरण करण्यात येणार आहे.