▶️ शनिवारी (२९ एप्रिल) पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी सन्मान सोहळ्यात होणार पुरस्कार वितरण
▶️ऐतिहासिक सन्मान सोहळ्याचे सर्वांनी व्हावे साक्षीदार
रत्नागिरी- योग म्हणजे कर्मकौशल्य आणि कर्मकौशल्य म्हणजेच योग. रत्नागिरी करांचे लाडके आणि मराठा मंडळ रत्नागिरीचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर रमेश चव्हाण यांच्याबाबतीत हे सुभाषित अगदी तंतोतंत लागू होते. माणुसकी, प्रसन्नता, सदा हसतमुख, शिस्तप्रिय, वैद्यकीय पेशाला आवश्यक असलेला प्रेमळपणा, संवेदनशीलता, रुग्ण सेवा देताना दिवस की रात्र याची तमा न बाळगता रुग्णांना सेवा हे प्रथम कर्तव्य मानणारे डॉ. रमेश केशवराव चव्हाण हे मराठा समाजातील एक थोर व्यक्तिमत्व आणि रुग्ण सेवाधर्म जपणारे, मानणारे डॉक्टर म्हणून सर्व परिचित आहेत. ही एवढी प्रस्तावना याचसाठी की देशातील नामवंत अशा नव्वदव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दैनिक नवभारत आणि त्याच समूहाचे दैनिक नवराष्ट्रतर्फे डॉ. रमेश चव्हाण यांना यावेळचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजता या वेळेत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या दैनिक नवराष्ट्र सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार डॉ. चव्हाण यांना प्रदान केला जाणार आहे. स्वस्तिक हॉस्पिटल, स्वस्तिक मेटरनिटी होम आणि चिरायु या हॉस्पिटल्सचे मालक असलेल्या डॉ. चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान केला जात असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी सन्मान सोहळ्यास उपस्थित राहणे हा या महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान ठरेल यात शंका नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत आणि सर्वच समाजात आदराचे स्थान असलेल्या डॉ. रमेश चव्हाण यांच्या या पुरस्कार सोहळ्याला त्यांच्यावर भर भरून प्रेम करणारे आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहाल, असा विश्वास आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी विनंतीही आहे.