
चिपळूण ,26 एप्रिल- चिपळूण तळसर येथे ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असलेल्या पुजाऱ्यावर गव्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. हल्ल्यातील जखमी पुजाऱ्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुकाराम बाळू बडदे असे या जखमी पुजाऱ्याचे नाव आहे.
तळसर गुरववाडी येथील ७५ वर्षीय बडदे हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असताना गव्याने अचानक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत तेथील ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती सायंकाळी ६ वाजता दूरध्वनीव्दारे वनविभागाला दिली गेल्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर व वनपाल दौलत भोसले यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन माहिती घेतली.
बडदे यांच्या उजव्या कानाच्या पाठीमागे गव्याचे शिंग डोक्यात घुसून गंभीर दुखापत झाली तेव्हा ते बेशुध्दावस्थेत पडले. त्यांच्यावर औषधोपचार चालू असून सध्या बडदे यांची प्रकृती स्थिर आहे.