▶️मुंबई ,26 एप्रिल-
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल मंगळवारी शिक्षण विभागाने स्वीकारला. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी या वेळी दिली. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल तसेच शेती, शेती व्यवसाय करणा-यांबद्दल जाणीव आणि संवेदनशीलता निर्माण होईल, असा विश्वास सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या संदर्भातील अहवाल कृषी विभागाने तयार केला असून तो अब्दुल सत्तार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना सुपूर्द केला. या वेळी बोलताना सत्तार म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्त्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे. कृषी शिक्षण विषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी विभागाची आहे.