▶️ 25 एप्रिल/ मुंबई-देशाची ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी इंधन बचत ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी सर्वच स्तरांवर जनजागृती होणे गरजेचे आहे असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
नैसर्गिक इंधनाची बचत आणि काटकसरीने वापर व्हावा, यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना, पेट्रोलियम, नैसर्गिक मंत्रालय आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम-२०२३) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते.
मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘सक्षम २०२२’ मध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. इंधन बचत या उपक्रमांतर्गत राज्यात सर्वाधिक कार्यक्रम करून देशात सर्वोच्च स्थान पटकावले, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसिद्धी करा इंधन बचतीचा संदेश घरोघरी पोहोचवा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हे देखील घरोघरी पोहोचवले असून याच धर्तीवर ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाची राज्यभरात प्रचार व प्रसिद्धी उपक्रम राबवावेत. नव्या पिढीला ही आव्हाने समजली पाहिजेत.