▪️ कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास कामगार मंडळ प्राधान्य देत आहे. कामगार मंडळाच्या क्रीडा सुविधांचा लाभ कामगार खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
▪️ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कामगार कब्बडी स्पर्धा मुंबई येथे होत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास सांगली येथून कामगार मंत्री डॉ. खाडे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले, जिल्हा सूचना अधिकारी यासीन सय्यद यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
▪️ कबड्डी स्पर्धा उद्घाटन सोहळा समारंभासाठी मुंबई येथे आमदार कालिदास कोळंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिती वेद-सिंघल, अपर पोलीस महासंचालक डॉ. रवींद्रकुमार सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कॅनरा बँकेचे मुख्य महाप्रबंधक पी. संतोष यांच्यासह मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे मान्यवर पदाधिकारी कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित होते.
▪️ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना प्रथमतः शुभेच्छा दिल्या. कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले, कामगारांचे जीवनमान उंचावावे त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी शिवणवर्ग, शिशु मंदिर, ग्रंथालय अभ्यासिका, व्यायामशाळा, टेबल टेनिस कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव अशा सुविधा पुरविण्यात येतात. याबरोबरच कामगार नाट्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, भजन स्पर्धा, समरगीत व स्फूर्ती गीत गायन स्पर्धा, साहित्य संमेलनेही आयोजित केली जातात. या सर्व स्पर्धा व उपक्रमामुळे कामगारांमध्ये आत्मविश्वास वाढतो. त्यांना नवीन ओळख मिळते, असे डॉ. खाडे म्हणाले.
▪️ कामगार खेळाडूंना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मंडळ नेहमीच पुढाकार घेते. कामगार मंडळामार्फत जुलै २०२१ मध्ये महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रबोधिनीतर्फे मागील वर्षी दोन वेळा अंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धा आणि दोन वेळा राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १ हजार १५६ खेळाडूंनी सहभाग घेतला. पाँडेचेरी येथे झालेल्या नॅशनल रँकिंग चॅम्पियनशिप-२०२१ स्पर्धेत महाकल्याण क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी टेबल टेनिस खेळात सुवर्ण आणि कांस्य पदके मिळवली आहेत ही अभिमानाची बाब आहे. तसेच इंदोर व चितोडगड येथे आयोजित स्पर्धेत ही स्पर्धकांनी सुवर्ण रौप्य आणि कास्य पदकांची कमाई केली असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यावेळी म्हणाले.
▪️ या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेत एकूण ११० संघ सहभागी झाले होते. यामध्ये ६० संघ महिलांचे आहेत. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे म्हणाले.