▶️…जर सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प नको असल्याची भूमिका जाहीर करावी : मंत्री उदय सामंत
मुंबई- बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राज्याच्या राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्व्हेक्षण रद्द करावं, अशी मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली. याबाबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांना पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हानही दिलं. ते मंगळवारी (२५ एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते.
उदय सामंत म्हणाले, “विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी काय मागणी केली हा नंतरचा विषय आहे. परंतु त्या ठिकाणची वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन ज्या पद्धतीने होईल असं अपेक्षित होतं तसं आंदोलन होत नाही असं विरोधकांना कळलं. लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत.”
“जर सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर…”
“मला सगळ्याच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि हा उद्योग आम्ही घालवतो आहे अशी भूमिका घ्यावी. मग बघू काय करायचं ते,” असं आव्हान उदय सामंत यांनी दिलं.
“मुख्यमंत्री नाराज असल्याने गावाकडे निघून गेले”
“मुख्यमंत्री नाराज असल्याने गावाकडे निघून गेले” या तर्कवितर्कांवर बोलताना उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.”
“दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा”
दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय यावर उदय सामंत म्हणाले, “राजकीय वर्तुळात ८ दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, उरलेल्या १३ आमदारांपैकी ७ आमदार आमच्याबरोबर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे अशीही चर्चा आहे. काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा आहेत. त्या तथ्यात उतरतील तेव्हात्याचा विचार करू.”
“मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल”
“पुढील दीड वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला