रत्नागिरी,दि. २५ (जिमाका):-
▪️मौजे बारसू, ता. राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरीच्या अनुषंगाने गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. सदर काम सुरु होण्यापूर्वी काल दि. २५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सर्वेक्षणाच्या ठिकाणी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उपस्थित जमावाला मा. पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांनी योग्य प्रकारे चर्चा करुन परिस्थिती हाताळलेली आहे.
▪️तसेच दुपारी २ वाजता पुन्हा एकदा सर्वेक्षणाच्या दिशेने येत असणाऱ्या जमावाला मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी, मा. पोलिस अधिक्षक, रत्नागिरी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, मा. उपविभागीय अधिकारी राजापूर, मा. प्रादेशिक अधिकारी, मऔविम, रत्नागिरी, मा. कार्यकारी अभियंता, मऔविम, रत्नागिरी व मा. तहसिलदार, राजापूर यांनी योग्यरित्या सामोरे जात त्यांच्याशी चर्चा केली. त्यापैकी १५ ते २० आंदोलन प्रतिनिधींना चर्चेसाठी सर्वेक्षणाच्या ठिकाणी बोलावण्यात आले. या बैठकीस उपस्थित १५ ते २० ग्रामस्थांशी जिल्हा प्रशासनाने चर्चा केली. चर्चेदरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी आपले म्हणणे मांडले त्यावर प्रथम मा. पोलिस अधिक्षक, रत्नागिरी यांनी त्यांचे कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकल्पाची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ग्रामीण भागातील गरीब, कष्टकरी महिला भगिनींना आंदोलनासाठी नाहक प्रवृत्त करु नये, असे आवाहन केले.
▪️तसेच जिल्हाधिकार्यांनी आंबा बागायती क्षेत्र तसेच मच्छीमार व्यवसायावर रिफायनरी प्रकल्पाचा दुष्परिणाम होणार नाही, याविषयी माहिती दिली. प्रकल्पाबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञांसोबत गुरुवार, दि. २७ एप्रिल २०२३ रोजी बैठक ठेवण्यात आलेली आहे.