मुंबई- मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी अनेक वर्षापासून आंदोलने सुरु आहेत. यात पन्नास पेक्षा जास्त युवकांनी बलिदान दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा कोणताही अभ्यास न करता सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळण्यात आली. या प्रकारामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
आता मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण (Maratha Reservation) समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पुणे, पिंपरी चिंचवड येथे येथे शनिवार दिनांक ६ मे २०२३ रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष दादा जावळे पाटील यांनी ही माहिती दिली.
पिंपरी येथे मंगळवार २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत धनाजी येळकर पाटील, सुधाकरराव माने, रामेश्वर शिंदे, चंद्रकांत सावंत, देविदास राजळे पाटील, रूपाली राक्षे पाटील,अनिता पाटील, संतोष वाघे, दादासाहेब पाटील, विजय कोरडे, गणेश सरकटे पाटील, गणेश भांडवलकर, सुरज ठाकर, आकाश हरकरे, हेमलता लांडे, ज्योती सगर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील श्रमशक्ती भवन, पुणे मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे दुपारी १२ वाजता होणाऱ्या या एल्गार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या एल्गार परिषदेमधून सरकारला खालील मागण्यासाठी अंतिम इशारा देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा
आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे. पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
या एल्गार परिषदेत सर्व मराठा समाज (Maratha Reservation) बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, आणि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.