
राजापूर : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणाला विराेध करणा-यांवर आज आंदोलनाचा दुस-या दिवशी पाेलिसांच्या बळाचा वापर सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पाेलिस आणि आंदाेलकांमध्ये हमरीतुमरी हाेत असताना दिसून येत आहे. खून झाला तरी चालेल, मेलाे तरी चालेल आम्ही लढणार मागे हटणार नाही अशी भूमिका बारसू प्रकल्पाला विराेध करणा-या ग्रामस्थांनी घेतली आहे.
यावेळी सर्व्हेक्षणाला आज महिलांनी तीव्र विराेध दर्शविला. आंदोलक पोलिसांच्या गाड्यांसमोर झोपले हाेतें. रस्त्यावर झोपून महिलांनी आंदोलन छेडले. पाेलिसांनी काही महिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी आंदोलनातील अनेक महिलांना तसेच आंदाेलकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. महिलांनी रिफायनरी रद्द करण्याची मागणी लावून धरली. जाेपर्यंत रिफायनरी रद्द हाेत नाही ताेपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार महिलांनी व्यक्त केला.
दरम्यान या आंदाेलनाचे चित्रीकरण करणा-यांना देखील पोलिसांकडून हटकण्याचा प्रयत्न झाला. पाेलिसांनी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना आंदाेलनस्थळापासून दूर राहा असे माईकवरुन पुकारले. त्यामुळे पत्रकारांना कव्हरेज करण्यासाठी देखील पाेलिसांनी मज्जाव केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आंदोलकांनी अखेरच्या श्वासपर्यंत लढणार हीच भूमिका कायम ठेवली आहे.