⏩पुणे ,25 एप्रिल-
ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभासंपन्न गायक आणि संगीतातील विविध रागांचा व बंदिशींचा मोठा संग्रह मुखोद्गत असणारे गायन गुरु पं. केदार बोडस (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. जुन्या पिढीतील ज्येष्ठ गायक पं. लक्ष्मणराव बोडस हे त्यांचे आजोबा आणि संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक-नट पं. नारायणराव बोडस यांचे केदार हे पुत्र आणि शिष्य होत. नारायणरावांच्या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता.
मधुमेहाच्या त्रासामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बोडस पुण्यातच होते. मधुमेह आणि त्यातून निर्माण झालेल्या काही विकारांमुळे सोमवारी दुपारी खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे ८७ वर्षांच्या मातोश्री आहेत. प. केदार बोडस यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.