रोजच्या जेवणासोबत आपल्याला तोंडी लावायला म्हणून काहीतरी चटपटीत, चमचमीत लागतंच. अशावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, पापड यांसारख्या पदार्थांचा समावेश आपल्या जेवणात करतो. काहीवेळेला आपल्याला रोजच्या त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. कधी आवडती भाजी नसली की चपाती आणि भातासोबत तोंडी लावायला म्हणून काही ना काही पदार्थ तयार केले जातात.
बटाटा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाट्याची भाजी. बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ आपल्याकडील प्रत्येक घरात केले जातात. अगदी फ्राईज, भाजी, रस्सा बटाटा भाजी, बबट्याचे स्नॅक्स असे विविध चविष्ट पदार्थ आपण बटाट्यापासून तयार करतो. आपल्याकडे सकाळच्या नाश्त्यासाठी केल्या जाणाऱ्या पोह्यामध्ये बटाटा नसेल तर नाश्ता अर्धवट वाटतो. तर कोणताही नेवैद्य हा बटाट्याच्या भाजीशिवाय पूर्ण होत नाही. बटाट्याचा कोणताही पदार्थ असेल तर जेवण परिपूर्ण झाल्यासारखे वाटते. जेवणात आपण पिवळी बटाट्याची भाजी तर बनवतोच त्याचबरोबर बटाट्याची रस्सा भाजी देखील आवडीने खाल्ली जाते. तसं पहायला गेलं तर बटाट्याचे असंख्य पदार्थ बनवले जातात. कधी जेवणात आवडती भाजी नसली किंवा भाजी कमी पडल्यास आपण बटाट्याचे क्रिस्पी काप अगदी लगेच बनवून साग्रसंगीत जेवण करु शकता. बटाट्याचे काप कसे बनवायचे ते पाहुयात
साहित्य :-
१. बटाटे – ३ ते ४ २. रवा – १/२ कप ३. तांदळाचे पीठ – १ टेबलस्पून ४. गरम मसाला – १ टेबलस्पून ५. लाल तिखट मसाला – १ टेबलस्पून ६. हळद – १/२ टेबलस्पून ७. मीठ – चवीनुसार ८. तेल – ३ ते ४ टेबलस्पून ९. कोथिंबीर – १ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. २. आता या बटाच्याच्या गोल पातळसर चकत्या कापून घ्याव्यात.३. या बटाट्याच्या गोल चकत्या एका बाउल,मध्ये पाणी घेऊन त्यात २० ते ३० मिनिटे भिजत ठेवाव्यात.
४. २० ते ३० मिनिटानंतर या बाऊलमधील पाणी काढून घेऊन त्यात हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला घालून या बटाट्याचे काप मॅरीनेट करुन घ्यावेत. ५. या बटाट्याचे काप कोटिंग करुन घेण्यासाठी एका बाऊलमध्ये रवा, तांदळाचे पीठ, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, मीठ एकत्रित करुन त्यात हे बटाट्याचे काप घोळवून घ्यावेत. ६. त्यानंतर एका पसरट तव्यावर तेल सोडून त्यावर हे काप दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
गरमागरम डाळ – भातासोबत हे मसालेदार, चमचमीत काप खाण्यासाठी तयार आहेत. बटाट्याचे काप सर्व्ह करताना त्यावर आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.