नवी मुंबई: सध्या राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला आहे. वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे घशाला कोरड पडते. त्यामुळे सतत काहीतरी पिण्याची इच्छा होते. तहान भागवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण रस्त्यावर विकला जाणारा थंडगार ज्यूस पीत असतील. मात्र, हा ज्यूस पिणे आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. सध्या नवी मुंबई एपीएमसी मार्केट मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधील हा व्हिडीओ पाहून तुम्ही रस्त्यावरचा ज्यूस पिणं बंद कराल.
उन्हाने त्रस्त होऊन फळांचा ज्यूस पिण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर सावधान. कारण ताज्या फळांचा ज्यूस पिण्याऐवजी तुम्ही सडक्या फळांचा ज्यूस तर पीत नाही ना याची खात्री करु घ्या. कारण नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून. या व्हिडीओमध्ये एक तरुण एपीएमसीमध्ये व्यापाऱ्यांनी फेकून दिलेली सडकी सफरचंद उचलताना दिसत आहे. तसेच ही सफरचंद ज्यूस तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली या फळे वेचणाऱ्याने स्वतः दिली आहे.
एपीएमसी मार्केटच्या जागेमध्येच व्यापाऱ्यांनी खराब झालेली सफरचंद फेकून दिली होती. ही सफरचंद खाण्यायोग्य नसून त्यांचा खराब वास येत होता. मात्र तरी सुद्धा ही सडलेली सफरचंद गोळा केली जात आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही व्यक्ती सफरचंद गोळा करण्यामध्ये मग्न झालेली आहे. तेवढ्यातच त्याला सफरचंद कशासाठी घेऊन जात आहे, असा प्रश्न विचारला असता तो घाबरून पटकन बोलून जातो घरी ज्यूस तयार करण्यासाठी. त्यामुळे हीच सडलेले सफरचंद घरी नेऊन त्याचा ज्यूस तयार केला जातो आणि मग तो ज्यूस फुटपाथवर किंवा रस्त्यावर जागा मिळेल तिथे बसून विकला जातो. गरम होत असल्यामुळे थोडासा थंडावा मिळावा यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या विक्रेत्यांकडून ज्यूस विकत घेऊन आवडीने पितात. पण खरं पाहायला गेलं तर हे असे ज्यूस पिणे आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. दोन पैशांसाठी हा अशाप्रकारे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र वारंवार समोर येत असते. यापूर्वीही रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबत, पाणी पुरीवाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता.