सर्वांनी मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधावा : पालकमंत्री उदय सामंत

Spread the love

ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार व जिल्हा परिषद आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

रत्नागिरी : गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्वांनीच राजकीय मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांनी आज स्वा. वि.दा. सावरकर नाटयगृह, मारुती मंदीर येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार व जिल्हा परिषद आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई,सहाय्यक प्रकल्प संचालक संतोष गमरे व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सरंपच आणि ग्रामसेवक ही गाडीची दोन चाके आहेत, ही विश्वासाने व समन्वयाने चालली पाहिजेत. दोघांनी एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत. गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार शासनाने दिले आहेत. त्यामुळे राजकीय मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधला पाहिजे. ते पुढे म्हणाले, ज्यांनी भारत देशाला स्वच्छतेचा संदेश दिला ती व्यक्ती म्हणजे संत गाडगेबाबा आणि म्हणून स्वच्छता अभियानाला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात आले. या स्वच्छता अभियानातून प्रत्येक गाव स्वच्छ होऊ लागले. यामुळे गावागावामध्ये आपलं गाव अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी स्पर्धा सुरु झाली. यासाठी ज्याला पुरस्कार मिळाला तसा आपल्यालाही मिळावा, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. हा सत्कार ग्रामपंचायत स्तरावरील फार महत्वाचा आहे. अशा सत्कार सोहळयातून जेव्हा पुरस्कार देण्यात येतो त्यावेळी पुरस्कार घेणाऱ्यामध्ये उमेद वाढते, त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊन आपली जबाबदारी अजून वाढले हे लक्षात येऊन तो अधिक जोमाने काम करतो आणि बघणाऱ्यांनाही अशा प्रकारचा पुरस्कार आपल्यालाही मिळावा, असे वाटते. कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ग्रामस्वच्छता अभियान हा आपल्या स्वत:साठी, स्वत:च्या गावासाठी फार महत्वाचा आहे. स्वच्छता अभियान राबविण्यामागे ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे, स्वच्छतेची सवयी अंगीकारुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेणे, हे उद्दिष्ट्य आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये स्वच्छता अभियान चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबाबत त्यांनी कौतुक केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) राहुल देसाई यांनी केले.

पुरस्कार वितरण संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2019-20, सन 2020-21 व सन 2021-22 अंतर्गत जिल्हास्तरीय व जिल्हा परिषद गट स्तरीय पुरस्कार आज पालकमंत्री उदय सामंत आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये सन 2019-20 मध्ये जिल्हास्तरावर नाचणे ग्रामपंचायत तर सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये संगमेश्वरमधील कोंड असुर्डे ग्रामपंचायती अव्वल ठरल्या असून त्यांचा पालकमंत्री उदय व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन 2019-20 मध्ये जिल्हास्तरावर द्वितीय कमांक चिपळूणमधील पोफळी ग्रा.पं., तृतीय कमांक गुहागरमधील अंजनवेल ग्रा.पं.ने पटकावला आहे. याच वर्षीचे विशेष पुरस्कारही ग्रामपंचायतीना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यामध्ये स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) मंडणगड तालुक्यातील सोवेली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे, तर स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) दापोलीतील तेरेवायंगणी या ग्रामपंचायतींचा पालकमंत्री उदय सामंत आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सन 2020-21 व सन 2021-22 अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार संगमेश्वरमधील कोंड असुर्डे ग्रामपंचायतील देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय क्रमांक गुहागरमधील खामशेत ग्रामपंचायत आणि तृतीय क्रमांक चिपळूणमधील मोरवणे ग्रामपंचायतीने पटकवला आहे. त्यांचाही पालकमंत्री उदय सामंत आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच वर्षातील विशेष पुरस्कार स्व.वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन) रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) राजापूर तालुक्यातील अणसुरे, तर स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) संगमेश्वरमधील सांगवे या ग्रामपंचयातीला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हयामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचाही आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page