⏩️नागपूर- नागपूरमध्ये अॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. या आगीमध्ये ३ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीत ही घटना घडली आहे. कटारिया अॅग्रो प्रा. लि. या कंपनीला सोमवारी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या 3 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सध्या ही आग नियंत्रणात आली आहे. कंपनीला लागलेली ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट आसपासच्या परिसरामध्ये पसरले आहेत. आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. कटारिया अॅग्रो कंपनीला लागलेल्या आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. फडणवीसांनी तातडीने नागपूरच्या जिल्हाधिकार्यांना याबाबत समन्वय साधण्यास सांगितले. या घटनेत जखमी झालेल्या तीन कामगारांना तातडीने चांगले उपचार मिळावेत, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.