23 एप्रिल/रत्नागिरी : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षण व कर आकारणीसंदर्भात सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा मंगळवारी (दि. २५) सकाळी ९ ते ५.३० या वेळेत हॉटेल व्यंकटेश येथे होणार आहे. यामध्ये धर्मादाय संस्थांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी भाग घेण्याचे आवाहन रत्नागिरी शाखेतर्फे करण्यात आले आहे.
धर्मादाय संस्था या आपल्या समाजाच्या महत्वाच्या घटक आहेत. या संस्था करत असलेल्या विविध लोकोपयोगी कामांमुळे सरकार प्राप्तिकर कायद्यातून काही सवलत या संस्थांना देते. मागील काही वर्षांपासून सरकारने खोट्या धर्मादाय संस्था विरुद्ध कडक पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने विविध प्राप्तिकर कलम तसेच नियमांमध्ये बदल केले आहेत जेणेकरून ज्या खरोखर उपयुक्त काम करणाऱ्या संस्था आहेत फक्त त्यांनाच लाभ मिळेल. मात्र या कडक नियमांमुळे छोटीशी चूक सुद्धा एखाद्या संस्थेला प्राप्तिकर सवलतीपासून वंचित ठेवू शकते.
रत्नागिरी सीए शाखा नेहमीच आपल्या सभासदांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करत असते. २५ एप्रिल रोजी रत्नागिरी सीए शाखेने धर्मादाय संस्था आणि प्राप्तिकर कायद्यातील बदल या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. मात्र विषयाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन या वेळची कार्यशाळा फक्त सभासदांसाठी मर्यादित न ठेवता धर्मादाय संस्था यांचे कार्यकारी मंडळ तसेच कर्मचारी यांना देखील याचा लाभ घेता येईल.
या कार्यशाळेमध्ये सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम भारत विभागीय समितीचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा उद्घाटनावेळी मार्गदर्शन करतील. त्यानंतर सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम भारत विभागीय समितीचे सदस्य सीए अभिजित केळकर, सीए गिरीश कुलकर्णी, सीए. प्रणव अष्टीकर, सीए डॉ. दिलीप सातभाई वरील विषयाच्या अनुषंगाने विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत सहभाग घेण्याचे आवाहन सीए इन्स्टिट्यूटचे रत्नागिरी शाखाध्यक्ष व या कार्यशाळेचे समन्वयक सीए मुकुंद मराठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सीए अभिजित चव्हाण 9604002743, सीए कपिल लिमये 8379898217, सीए नेहा वारेकर 8806922973 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.