⏩23 एप्रिल/रत्नागिरी : शाळेत शिकताना पुस्तकातले बागकामाचे धडे गिरवून उपयोग नाही तर प्रत्यक्षात शेतीकामाचेही धडे गिरवून मातीशी नाळ जुळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना लहान वयातच याची माहिती मिळावी याकरीता पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रामध्ये कलम बांधणी, फळरोपवाटिका यासंदर्भातील माहिती व प्रात्यक्षिकाचे आयोजन गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांच्या जयंती दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी केले होते. यामध्ये पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी आनंदाने भाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून माहिती घेतानाच कलम बांधणीचाही अनुभव घेतला.
काजू, आंबा, जायफळ, आणि दालचिनी, काळीमिरी यांच्या कलम बांधणीचे प्रात्यक्षिक या वेळी दाखवण्यात आले. कलम बांधणीसाठी पोमेंडी येथील रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यात आली होती. जायफळाचे झाड नर आहे की मादी हे सात-आठ वर्षानंतर कळते व फळधारणा न झाल्यास शेतकऱ्याची मेहनत फुकट जाते. याकरिता जायफळाचे कलम बांधून लागवड केली जाते. कोणत्या झाडाचे कलम कोणत्या हंगामात बांधले जाते, याचीही माहिती या वेळी देण्यात आली. याप्रसंगी पोमेंडीतील रोपवाटिकेचे प्रमुख डॉ. कुंभार हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघाने यापूर्वीही विद्यार्थ्यांसाठी शेतीविषयक अशी प्रशिक्षणे आयोजित केली आहेत.
झाडाच्या फुल, पान, खोड, फांदी, बी यापासून अभिवृद्धी होत असते. लिंबू डोळा भरणे, भेट कलम, स्टोन कलम, मृदूकाष्ठ कलम पद्धतींविषयी या वेळी माहिती देण्यात आली. समारोप कार्यक्रमाला कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. श्रीरंग कद्रेकर, भाट्ये नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, कृषी विद्यावेत्ता व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. सुनील घवाळी, दीपक साबळे, सौ. हेमा भाटकर उपस्थित होते. पटवर्धन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक वसंत आर्ड्ये, पर्यवेक्षक सत्यवान कोत्रे, शिक्षक पंडित राठोड, सौ. प्रीती केळकर, गौरी गांधी, उमेश दिवटे उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थिनी अनुष्का वाघचवरे, अमेय पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना हा अनुभव लक्षात राहण्यासारखा आहे. कारण प्रत्यक्षात कलम कसे बांधले जाते, जायपत्री म्हणजे काय, दालचिनीची साल कशी काढावी याबाबतची माहिती प्रथमच मिळाली. फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष शेतीत, मातीत काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. शेतकरी, बागायतदार कसे काम करतात, याची माहिती मिळाली. दर महिन्याला असा उपक्रम राबवल्यास भावी आयुष्यात याचा उपयोग होईल, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.