
⏩ मुंबई- राज्यातील राजकारणात सध्या भेटीगाठींचे सत्र जोमात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून भेटीगाठींच्या सत्राला सुरुवात झाली आहे. अशातच मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्व्हर ओक येथे शुक्रवार २१ एप्रिल रोजी ही भेट झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
उदय सामंत आणि शरद पवार यांची ही तिसरी भेट आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात भेटी सुरू आहेत. दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणूक निकालाच्या निमित्ताने ही भेट झाल्याची माहिती उदय सामंत यांनी बैठकीनंतर दिली आहे.
दरम्यान गुरुवारी, २० एप्रिल रोजी उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली असून तब्बल दोन तास त्यांच्यात चर्चा झाली.