रत्नागिरी :- कमाल तापमानात वाढ झाली असताना चक्राकार वार्याची स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावाने उत्तर कोकणात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत या वातावरणीय स्थितीचा प्रभाव सौम्य असला तरी पालघर जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून, पालघर तालुक्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नैऋत्य समुद्र सपाटीपासून दीड ते ३ कि.मी. अंतरावर वार्याची चक्राकार स्थिती कायम आहे. त्याचबरोबर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर अंतरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय असल्याने वार्याचा प्रवाह वेगाने सुरू राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उत्तर कोकणात विशेषतः पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे आगामी दोन दिवस उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस कमाल तापमानात वाढ होताना अवकाळीचे संकट कायम आहे. मात्र, वातावरणातील बदलाने तापमानात आणखीन १ ते २ अंशांची वाढ शक्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या तापामानातही किंचित वाढ झाली असून सोमवारी रात्री जिल्ह्यात विविध भागात २६ ते २८ अंश तापमानाची नोंद झाली.