मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार देखील भाजप सोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. मात्र स्वतः अजितदादा पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. असं असूनही अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरील राजकीय वर्तुळातील चर्चा थांबलेल्या नाहीत. अशातच एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी कार्यक्रमाच्या एका प्रसिद्धीपत्रकावरून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे.
शुक्रवार २१ एप्रिल रोजी घाटकोपर येथे राष्ट्रीय काँग्रेसचं विभागीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर २०२३ होणार आहे. या शिबीराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकावरून अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळं आता या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.
या शिबिराला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार हे स्वत: उपस्थित राहणार असून, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर पार पडणार आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ‘ध्येय राष्ट्रवादीचे…मुंबई विकासाचे’…या शिर्षकाखाली हे शिबिर होणार आहे. याचे उद्घाटन जयंत पाटील करणार आहेत. या शिबिरासाठी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणणार आहेत. तसेच हे सर्व नेते मार्गदर्शनही करणार आहेत.
अजित पवार यांचा त्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते या शिबिरात उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली जात आहे.