मुंबई : कुणबी समाजाच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा एक क्षण येत आहे. गेली अनेक वर्ष कुणबी समाजाला राजकीय हक्काचे अस्तित्व प्राप्त होत नव्हते. आता यासाठीच कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी राजकीय संघटन समितीच्या माध्यमातून स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना दिनांक 22 एप्रिल रोजी रवींद्र नाट्य गृह प्रभादेवी येथे सकाळी १० वाजता आयोजित सभेत होणार आहे. या सभेला कोकणातील बहुसंख्य कुणबी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी प्रवर्गातील सर्वात मोठा घटक म्हणून कुणबी समाजाकडे पाहिले जाते. मात्र गेली अनेक वर्ष कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकास सुद्धा झालेला नाही. राजकीय क्षेत्रामध्ये हाताच्या बोटावरती मोजणारे प्रतिनिधित्व कधीतरी कुणबी समाजाला मिळत आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कुणबी समाज इतर पक्षांच्या दावणीलाच बांधला होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करत आता कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी राजकीय समिती संघटन या समितीचे अध्यक्ष अशोक वालम व इतर पदाधिकारी यांनी समाजातील लोकांना राजकीय अस्तित्व प्राप्त व्हावे यासाठी स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचे ठरवले.
याची पहिली सभा ९ एप्रिल रोजी मुंबई येथे पार पडली. त्या सभेला सुद्धा कोकणातील बहुसंख्य राजकीय क्षेत्रातील समाजातील मंडळी उपस्थित होती. या सभेत झालेल्या चर्चेनुसार कुणबी समाज दिलेला कौल लक्षात घेऊन आता 22 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता रवींद्र नाट्यगृह प्रभादेवी या ठिकाणी पक्षाची अधिकृतपणे घोषणा होणार आहे. समाजासाठी राजकीय अस्तित्वाची ही गुढी उभारण्यात येणार असून या नवीन पक्षामध्ये सगळ्या समाजातील बांधवांना सामावून घेण्याचे सुद्धा ठरवण्यात आले आहे. राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम, सरचिटणीस नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, प्रकाश तरळ आणि कार्याध्यक्ष कृष्णा कोबनाक , संघाचे अध्यक्ष भूषण बरे आणि सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पक्षाची घोषणा होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येईल. समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता हे उचललेले पाऊल कितपत योग्य ठरेल हे सुध्दा महत्वाचे आहे. मात्र, सद्यस्थितीत कुणबी समाज स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करीत आहे, हे अभिमानाची बाब आहे. आता थांबायचे नाही.. आपल्या हक्क अधिकारांसाठी लढायचे. असा विश्वास सर्वांनी व्यक्त केले आहे. राजकीय समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी पुढाकार घेत हे महत्वाचे पाऊल उचलले. नव्या राजकीय पक्षाचा विजयी झेंडा फडकवण्यास सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.