स्थानिकांचा उपोषणाचा इशारा
कर्जत तालुक्यातील जिते-बोर्ले या गावांना जोडणार्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात येत असून, ते अर्धवट अवस्थेत आहे. त्यात कामाची मुदत संपली असूनदेखील रस्त्याचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 26 एप्रिल रोजी या भागातील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत, असे निवेदन ग्रामीण विकास यंत्रणा तसेच पोलीस प्रशासन आणि तहसीलदार यांना दिली आहेत.
नेरळ- कशेळे या भीमाशंकर राज्य मार्ग येथून बोर्ले गाव आणि पुढे जिते गावापर्यंत रस्ता एप्रिल 2021 रोजी मंजूर झाला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मधून हे रस्त्याचे काम महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ग्रामविकास तसेच जलसंधारण विभाग यांच्याकडून केले जात आहे. दोन कोटी 28 लाखांच्या निधीमधून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या या रस्त्याचे काम श्री सिद्धिविनायक कंन्स्ट्रक्शन कंपनीने मिळविले होते. रस्त्याचे काम निर्धारित वेळेत सुरु झाले आणि त्यामुळे रस्त्याचे काम एप्रिल 2022 मध्ये पूर्ण होणार असे स्थानिक ग्रामस्थांना वाटले होते. मात्र, मुदत संपून दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.
फेब्रुवारी मध्ये रस्त्याच्या कामासाठी दिलेली मुदतवाढ संपली आहे. तरी देखील रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने आता स्थानिक रहिवाशी आणि ग्रामस्थ यांनी रस्त्याच्या कामासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक रहिवाशी यांच्यावतीने शशिकांत मोहिते, विजय घरत, सुनील राणे, विनायक घरत, सुपेश जाधव, चंद्रकांत हजारे, हनुमान जाधव, केतन घरत, आकाश जाधव आणि मंगल मिरकुटे आदींच्या सह्या असलेले निवेदन ग्रामीण विकास यंत्रणा कार्यकारी अभियंता तसेच कर्जत तहसीलदार आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.