
⏩रत्नागिरी, प्रतिनिधी :
उत्तम आरोग्यपूर्ण नागरिकांमुळे उत्तम समाज घडत असतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे. देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेतं राहावे या उक्तीनुसार आपण सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन आयएमएच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्यासोबतच इथल्या सामाजिक आरोग्यासाठी कार्य करूया असे प्रतिपादन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे यांनी केले.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून मागच्या वर्षीचे अध्यक्ष डॉ. निलेश नाफडे व डॉ. निनाद नाफडे यांनी त्यांना अध्यक्ष पदाची सूत्रे सुपूर्त केली. यावेळी त्या बोलत होत्या. उत्तम आरोग्यपूर्ण नागरिकांमुळे उत्तम समाज घडत असतो. याचवेळी बदलत्या काळात बदलत्या उपचार पद्धतीच्या संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर यासह आयएमएचे एफबी लाइव्ह आणि स्वतंत्र यु ट्यूब चॅनेल सुरु करून आपण सुद्धा नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा सोशल मार्ग निवडूया, एकत्र येऊन सुदृढ समाज घडवण्यासाठी आपले योगदान देऊया असे आवाहन डॉ. तोरल शिंदे यांनी यावेळी केले.
यावेळी आयएमएची सन 2023-24साठीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षस्थानी डॉ. तोरल निलेश शिंदे, उपाध्यक्षपदी डॉ. अतुल ढगे, सचिवपदी डॉ. प्रज्ञा पोतदार, खजिनदार पदी डॉ. अजिंक्य गांगण, लायब्रेरियन डॉ. स्मृती प्रभुदेसाई तर विमेनसेल चेअरपर्सन डॉ. सोनाली पाथरे तर व्हाईस चेअरपर्सन म्हणून. डॉ. स्वाती गांगण यांची निवड झाली आहे. ही निवड एक वर्षासाठी झाली आहे. यावेळी डॉ. बेडेकर, डॉ. म्हसकर, डॉ. भोळे, डॉ. शेरे, डॉ. वंडकर व इतर रत्नागिरीतील आय एम ए रत्नागिरीचे सदस्य उपस्थित होते.