⏩मुंबई ,18 एप्रिल
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार असल्याचे अनेक संकेत मिळत आहेत. सध्या सर्वच अनुभवी नेते आपल्या परीने भाकित, दावे करताना दिसत आहेत. या सगळ्या दाव्यांचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आहेत. राष्ट्रवादीच्या एका गोटात वेगळेच काहीतरी शिजत असून, त्याचे परिणाम थेट महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येणार आहेत.
गेल्या आठवड्यात नॉट रिचेबल झालेले अजित पवार यांनी काल पुन्हा एकदा एकाएकी पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द केला. त्यांच्या कार्यालयाकडून प्रकृती अस्वस्थ्याचे कारण दिले जात आहे. मात्र अजित पवार कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा आहे. तर अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी तर या पक्षप्रवेशाचा मुहूर्त केव्हा असेल, हेसुद्धा सांगून टाकले आहे.
रवी राणा म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांच्याच संमतीनेच भाजपसोबत येतील. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हिरवा कंदील देतील तेव्हा अजित पवार भाजपसोबत येतील. आणि हा हिरवा कंदील केव्हाही दाखवला जाऊ शकतो. त्याच दिवशी अजित पवार नॉट रिचेबल होतील, असा दावा राणा यांनी केला.
ते म्हणाले, ३३ महिन्याच्या मविआ सरकारमध्ये असताना अजित पवार यांचा श्वास गुदमरला आहे. शरद पवार आणि मोदींचे संबंध काय आहे हे सर्व देशाला माहित आहे. उद्धव ठाकरेंसोबत सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी मन लावून काम केले नाही कारण ते सरकार कामच करत नव्हते असे त्यांचे यापूर्वी म्हणणे होते. उद्धव ठाकरे यांच्या एकतर्फी धोरणामुळे अजित पवार यांनी पाहिलेले स्वप्न अपुरे राहिले. आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येऊन अजित पवार अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार असल्याचे रवी राणा म्हणाले.