☯️अजित पवार यांची पक्षातच कोंडी, ‘टोकाचा निर्णय’ घेण्यास भाग पाडण्याची खेळी?

Spread the love

⏩मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असून त्यांच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता यामध्ये तोंड उघडण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याचीही चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे वृत्त गेल्याच आठवड्यामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्या वेळेस अजित पवार हे आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी अनेक बैठका सुरू असल्याचीही माहिती पुढे आली होती. इतकेच नव्हे, तर अजित पवार यांना पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य व पाठिंबा लाभत असल्याचेही उघडपणे बोलले जात होते. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून पक्षाचे काही आमदार पक्षाबाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर सोमवारी अजित पवार हे पुणे दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करून मुंबईतच थांबल्याने पुन्हा एकदा ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर पवार यांनी खुलासाही केला. रविवारी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊ रुग्णालयात दाखल झालेल्यांच्या चौकशीसाठी आपण मुंबईत थांबलो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या वागण्याने तयार झालेले संशयाचे धुके निवळायला तयार नव्हते.

राष्ट्रवादीतील अनेक आमदार व नेत्यांमध्ये सद्य राजकीय परिस्थितीत भाजपला विरोध करावा की, भाजपसोबत जावे याबाबत संभ्रम आहे. काही आमदारांचे मत महाविकास आघाडीचा जनाधार वाढत असल्याने भाजपविरोधातील लढा तीव्र करावा, असे आहे. तर काही आमदार मात्र केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा थांबविण्यासाठी भाजपची वाट धरावी, या मताचे आहेत. आमदारांमधील हा संभ्रम दूर करण्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या प्रयत्नांना फारसे यश मिळताना दिसत नसून, नेतृत्वाने कोणतीही ठोस वैचारिक भूमिका न घेतल्यामुळे या संभ्रमात दररोज भर पडते आहे.

भाजपसोबत जायला हवे, असे मानणाऱ्यांच्या गटात अनेक जुनेजाणते नेते असून त्यात अनेक वर्षे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व सत्ता हातात नसतानाही ज्यांना कायम विधान परिषद अथवा राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले नेतेही आहेत, असे समजते. मात्र या सगळ्या बंडामागे एकमेव नेते अजित पवार हेच आहेत असा समज सध्या प्रसार माध्यमांमधून पसरला असून त्याबाबत राष्ट्रवादीचे शीर्षस्थ नेतृत्वही तोंडात मिठाची गुळणी घेऊनच बसले आहे. त्यामुळे अजित पवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ असून ही सर्व अजित पवार यांची कोंडी करण्याचीच खेळी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीतील एकही ज्येष्ठ नेता याबाबत प्रसार माध्यमांसमोर येऊन परिस्थितीबाबत कोणताही खुलासा करताना दिसत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.

कोकाटे, बनसोडे यांचा जाहीर पाठिंबा
अजित पवार यांनी कोणताही निर्णय घेतला तरीही आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत, अशी भूमिका सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे व पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सोमवारी मांडली. अजित पवार पक्षाबाहेर गेले तर त्यांच्यासोबत कोण कोण असेल, याची चाचपणी पक्षनेतृत्वाकडून गेले दोन दिवस करण्यात येत आहे. शरद पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय अनेकांना दूरध्वनी करून याबाबत विचारणा करीत आहेत. त्यात आता कोकाटे व बनसोडे यांनी जाहीर भूमिका घेतल्याने यादीत आणखी कुणाची भर पडणार याबद्दल औत्सुक्य आहे.

“आदिती नलावडे प्रदेश सरचिटणीस*
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी अदिती नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाचे प्रशासन, दैनंदिन पत्रव्यवहार, प्रचार साहित्य वाटप यांची जवाबदारी देण्यात आली आहे. नलावडे या सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत विश्वासातल्या समजल्या जातात. साहजिकच त्यांच्या नियुक्तीनंतर सुप्रिया सुळे यांचा प्रदेश कार्यालयातील वरचष्मा वाढणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page