मुंबई(शांताराम गुडेकर/सुभाष हांडे देशमुख )

नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक भवन मध्ये नेरुळ जेष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालय यांच्या विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी झाली.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक विवेकचे सहसंपादक रवीजी गोळे यांची उपस्थिती लाभली.याप्रसंगी राजेश कांबळे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर,प्रकाश लाखापते,श्रीमती सीमा आगवणे,विद्या भवनचे प्राचार्य मिसाळ सर,अडसूळ सर, पांडुरंग क्षेत्रमाडे,दीपक दिघे,नंदलाल बॅनर्जी,रणजीत दीक्षित,विकास साठे,पी.आर.गुप्ता,गजानन म्हात्रे,पत्रकार विकास पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रेमी असल्यामुळे महानगरपालिकेच्या तीन शाळांना पुस्तकांचे संच वाटण्यात आले.यानिमित्ताने इयत्ता दहावी व बारावी मधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी भारताचे संविधान वाचावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा या हेतूने आयोजित या निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा यथोचित गुणगौरव करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजेश कांबळे यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे समग्र दर्शन घडविले.भारतीय संविधानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तर रवीजी गोळे यांनी महाडचे चवदार तळे तसेच काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. आंबेडकर यांचा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून केलेला सत्याग्रह होता असे प्रतिपादन केले. प्रसंगी सौ.वृंदा परुळेकर,सौ.स्मिता उधळीकर,कुमारी नीलम तरकसबंद,छोटी उल्का यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस ग्रंथालयाचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना तसेच बुद्ध वंदना व महाराष्ट्र गीत सादर केले. सचिव सीमा आगवणे यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन त्यांचा परिचय करुन दिला. तर कार्याध्यक्ष विकास साठे यांनी प्रास्ताविकात ग्रंथालयाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. अरविंद वाळवेकर यांनी ग्रंथालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास साठे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा आगवणे यांनी केले.सर्वश्री विजय सावंत,दत्ताराम आंब्रे, रणजित दीक्षित, श्रीमती रजनी कलोसे, श्रीमती कमल आंगणे, श्रीमती वर्षा आदींनी तसेच सर्वांच्या सांघिक प्रयत्नांमुळे कार्यक्रम अधिक उठावदार व यशस्वी झाला.