खेड : लोटेतील गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ६ दिवस उलटले तरीही प्रशासकीय यंत्रणा अथवा लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याच्या निषेधार्थ १८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आपल्या गोधनासह महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा कोकरे यांनी दिला आहे. दरम्यान, वारकरी सांप्रदायाने कोकरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला असून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे वारकरी सांप्रदायाचे राष्ट्रीय कीर्तनकार विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी सांगितले.. –
गोशाळेच्या जागेचा प्रश्न सोडवा, उर्वरित २५ लाख रूपयांचे अनुदान तत्काळ द्या, या मागणीसाठी गोशाळेतच उपोषणाला बसलेल्या कोकरे यांनी शनिवारी सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवले आहे. मात्र या उपोषणाकडे पशुसंवर्धन विभाग वगळता उर्वरित प्रशासकीय यंत्रणा तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे येत्या २ दिवसांत यासंदर्भात योग्य तो निर्णय न झाल्यास मंगळवारी सायंकाळी गोशाळेतील सर्व गाईना घेऊन महामार्ग रोखणार असल्याचे कोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.