सिंधुदुर्ग | महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये दोन मुलींसह आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी कर्नाटकातील बेळगावी येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. वैरी बीचवर हा अपघात झाला. स्थानिक मच्छिमारांनी तीन विद्यार्थ्यांना बुडण्यापासून वाचवले, त्यापैकी एकाला गंभीर अवस्थेत मालवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेळगावच्या मराठा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी शिकत असून, त्यांच्याकडून सहलीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगावच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ५० मुले मालवण येथे सहलीसाठी आली होती. वैरी समुद्रकिनारी स्थानिक लोकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून ते समुद्रात गेले आणि जोरदार लाटांच्या तडाख्यात बुडाले. स्थानिक मच्छिमारांनी तीन विद्यार्थ्यांना वाचवले मात्र आठ मुलांचा मृत्यू झाला. मृतांचे वय २२ ते २५ वर्षे आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास हा अपघात झाला.