देवरुख : संभाव्य भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मान्सूनच्या आगमनापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने १८ एप्रिलपासून शहरातील नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा; काटकसरीने वापरून करून नगर पंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
देवरूख शहराला पर्शरामवाडी व घावडेवाडी येथील धरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. २ हजाराहून अधिक नळधारक नागरिक या पाण्याचा
लाभ घेत आहेत. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पाण्याच्या पातळीतही घट होवू लागली आहे. भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफीक महासागरातील अल निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. अल निनो प्रभावाच्या धर्तीवर ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरेल अशाप्रकारें पाणीपुरवठा करण्याकामी नियोजन व उपाययोजना करण्याच्या सूचना शासनस्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. अल निनोच्या प्रभावामुळे वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पर्शरामवाडी व धावडेवाडी धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होत आहे. सद्यस्थितीत धरणात ३० मे पर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे