⏩आधी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यानंतर गुरुवारी (१३ एप्रिल) शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचीही चर्चा आहे. याबाबत शुक्रवारी (१४ एप्रिल) मुंबईत पत्रकारांनी संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.
दिल्लीतील पवारांच्या बैठकीनंतर राहुल गांधी – उद्धव ठाकरे भेटणार का? यावर संजय राऊत म्हणाले, “२०२४ च्या दृष्टीने देशातील प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांची एक बैठक झालीय. नितीश आणि तेजस्वी राहुल गांधींना आणि मल्लिकार्जून खर्गेंना भेटले. गुरुवारी (१३ एप्रिल) शरद पवार, राहुल गांधी आणि खर्गे भेटले. त्याआधी मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली.”
☯️“महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू”
“मला आजच समजलं की, राहुल गांधी ममता बॅनर्जी यांनाही भेटणार आहेत. या देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना भेटून ते एकत्र येण्यासाठी काम करत आहेत. त्यात आम्हीही सहभागी आहोत. महाराष्ट्रात आम्ही लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकू, असं वातावरण आहे,” असं दावा संजय राऊतांनी केला.
☯️“मी त्यांना सांगितलं होतं की, आपण महाराष्ट्रात यायला हवं”
“मी अलिकडे दिल्लीत राहुल गांधींना भेटलो. सोनिया गांधीही तिकडे होत्या तेव्हाही आमची राज्यातील राजकीय वातावरणाविषयी चर्चा झाली. तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की, आपण महाराष्ट्रात यायला हवं. आपण सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. सोमवारी (१७ एप्रिल) सायंकाळी काँग्रेसचे महासचिव वेणूगोपाल मुंबईत येऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. त्याआधी काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाली आहे. या भेटीत भविष्यातील बऱ्याच गोष्टी ठरतील,” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.