
रत्नागिरी:- मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील राजापूर तालुक्यातील हातिवले येथे उभारण्यात आलेला टोलनाका तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे टोल वसुली स्थगित राहणार आहे. स्थानिकांच्या मागणी आणि समस्या जाणून घेतल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या विषयी दि. १४ एप्रिल रोजी राजापूर येथे स्थानिक ग्रामस्थांबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राजापूर येथील काही स्थानिक नागरिकांचा टोलला विरोध नाही. पण, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जाणून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले. स्थानिकांच्या समस्या विचारात घेतल्या जातील टोलवसुली कमी पैसे देऊन व्हावी, या मताशी नागरिक सहमत आहेत तरीही स्थानिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि विरोध का आहे, याची बैठकीत शहानिशा करण्यात येईल, असेही पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मंगळवारी पोलिस बंदोबस्तात राजापूरमध्ये टोल वसुली करण्याचा प्रयत्न केला जाणे, हे चुकीचे आहे. पोलिस बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकता नव्हती. राजपूरमधील नागरिकांच्या ज्या काहीमागण्या आहेत, त्याविषयी चर्चाविनिमय करून यातून मार्ग काढला जाईल त्यामुळे तूर्तास टोलनाका बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.