
रत्नागिरी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने सर्व एसटी बसस्थानकांवर स्वच्छतामोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. ही मोहीम घोषित करून ४ महिने झाले. प्रत्यक्षात मात्र राज्यातील मुख्य बसस्थानके अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील अशा अस्वच्छ १६ बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती छायाचित्रांसह एसटी महामंडळाला देण्यात आली. हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन ही छायाचित्रे आणि त्या विषयीची माहिती त्यांच्याकडे दिली.मुख्य बसस्थानकांची अशी दुरवस्था झाली असेल तर राज्यात खरोखर स्वच्छतामोहीम राबवली जात आहे का की ही मोहीम कागदावरच आहे? असा प्रश्न उपस्थित करत या मोहिमेचा आढावा घेऊन बसस्थानक स्वच्छतामोहीम प्रामाणिकपणे राबवण्यात यावी, अशी मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आली. या वेळी व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी या प्रकरणात लक्ष घालतो, असे आश्वासन दिले. बसस्थानक स्वच्छतामोहिमेची ही वस्तुस्थिती मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री एकनाथ शिंदे यांनाही व्हावी यासाठी ही सर्व माहिती परिवहन विभागाकडेही सुपूर्द करण्यात आली.रत्नागिरी, सोलापूर, देवगड, सावंतवाडी, भुसावळ, जळगाव, दापोली, राजापूर, खेड, सातारा, स्वारगेट, कराड, अमरावती, अकोला, आर्णी आणि वणी बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती आणि छायाचित्रे प्रशासनाकडे देण्यात आली. यामध्ये प्रसाधनगृहाची दुरवस्था, बसस्थानकांच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य, भित्तीपत्रकांमुळे विद्रुप झालेल्या भिंती, तुटलेली व अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपहारगृहे आदी बसस्थानकांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे आढळून आले.
आज नफा-तोटा यांचा विचार न करता एसटी रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी अखंडपणे धावते. एसटीचा उत्कर्ष करायचा असेल तर प्रथम बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्याप्रकारे दिल्या पाहिजेत. अशी मागणी सुराज्य अभियानाने शासनाकडे केली आहे.
रत्नागिरी, चिपळूणसह अन्य बसस्थानकांची कामे गेली तीन-चार वर्षे रखडली आहेत. हे काम नक्की कधी होणार आहे, असा सवाल सुराज्य अभियानाने केला आहे. प्रवासी रस्त्यावर ताटकळत उभे राहत आहेत, येत्या पावसाळ्यातही त्यांना भिजतच एसटीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे या कामासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.