▶️चिपळूण : शिंदे गट शिवसेना व भाजप यांच्या वतीने आज दि… ११ रोजी सायंकाळी ५ वा. स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा संभाजी महाराज चौकापासून सुरू होणार आहे.
राष्ट्रपुरुष व देवदेवता यांच्याबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्ये होत आहेत. अशा वक्तव्यांचा निषेध म्हणून सध्या राज्यभर स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील हिंदू राष्ट्रप्रेमी व सावरकर प्रेमी यांच्या वतीने गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. शिंदे शिवसेना गट, भाजप व राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या यात्रेला मार्कंडी येथील संभाजी चौकातून सायंकाळी ५ वा. सुरुवात होणार आहे.
संभाजी चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक (चिंचनाका) मार्गे बाजारपेठ, गांधी चौक तेथून मागे फिरून ग्रामदैवत जुना कालभैरव मंदिर येथे यात्रेची सांगता होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. या गौरव यात्रेत सर्व हिंदू राष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी गोखले, भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहरप्रमुख महंमद फकीर, भाजप शहर अध्यक्ष आशिष खातू यांनी केले आहे.