रत्नागिरी न.प.त सत्ताबाह्य केंद्राचा वावर ,खिरापत वाटल्याप्रमाणे कामांचे वाटप सुरु साळवी – कीर यांचा रोख नेमका कोणाकडे ?

Spread the love

रत्नागिरी :- पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांची पोटं भरण्यासाठी खिरापत वाटल्याप्रमाणे कामे दिली जात आहेत . जे सोबत गेले नाहीत , त्यांची विकास कामे जाणीवपूर्वक रखडवली जात असून , रत्नागिरी पालिकेत सत्ताबाह्य केंद्र चालवले जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी आणि मिलिंद कीर यांनी केला .
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये , बशिर मुर्तुझा , शहराध्यक्ष निलेश भोसले तर शिवसेनेचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे , प्रमोद शेरे , माजी नगरसेवक बाबा नागवेकर व पदाधिकारी उपस्थित होते . शहरात सर्वत्र विकासकामे होत असताना प्रभाग क्र . ११ मधील २४ लाख ५० हजारांचे रस्त्याचे काम रखडवले आहे . कामाची निविदा निघून दोन वर्षे झाली . ते काम अजून न झाल्याने कामाची मुदत संपुष्टात आली . हे रस्त्याचे महत्त्वाचे काम काहींनी थांबविले आहे . प्रभाग क्र . ८ मध्येही ६ लाखांचे काम घेण्यात आले होते . त्याचीही तीच परिस्थिती आहे . शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण होऊन अजून २ वर्षे झालेली नाहीत . रस्त्याला ३ वर्षांची हमी असताना ठेकेदारांनी नादुरूस्त रस्ते दुरूस्त करण्याची जबाबदारी त्याची आहे . त्या आधीच नवीन ९६ कोटीची काँक्रिटीकरणाचे काम घेण्यात आले आहे . रस्ते आता चांगले आहेत , त्यापेक्षा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या मजबुतीसाठी ९६ कोटींचा निधी
वळवावा , अशी मागणी प्रशासकांकडे करण्यात आली . यावेळी बोलताना मिलिंद कीर म्हणाले की , २०११ ला नगराध्यक्ष होतो , तेव्हा पालिकेची जी परिस्थिती आहे तीच आता आहे . पालिकेवर तेव्हा ३२ कोटींचा बोजा होता आता पालिकेवर ७० कोटींच्यावर बोजा गेला आहे . त्यामुळे भविष्यात ज्याची सत्ता येईल त्याला ही देणी भागवताना नाकीनऊ येणार आहेत . त्यामुळे विकासकामे करण्याची संधीच मिळणार नाही . विकास कामांसाठी जो १५ टक्के निधी म्हणजे १५ कोटी रुपये पालिका फंडातून वापरले आहेत , तो पैसा चांगल्या विकासकामांवर वापरावा . भरमसाठ कामे काढली जात आहेत . त्यामुळे पालिकेवर बोजा वाढत आहे . पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे . शहरात सुधारित पाणी योजना सुरू झाली . परंतु या योजनेची हायड्रोलिक चाचणी करण्यापूर्वीच ठिकठिकाणी पाईपलाईन फुटत आहे . या चाचणीसाठी ६ कोटी रुपये देण्यात आले आहेत . ही चाचणी झाल्याशिवाय पाणी योजना पालिकेने ताब्यात घेऊ नये , अशी मागणी मिलिंद कीर यांनी केली आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page