पंतप्रधान नरेंद्र मोदी
हैदराबाद- देशवासीयांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण करण्याला आमच्या सरकारने प्राधान्य दिले. विकासाच्या प्रगतीमुळे मूठभर लोक खूप संतप्त आहेत. घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्यांना देशहित आणि समाजहिताशी काही देणेघेणे नाही, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांसाठी ते अडचणी निर्माण करत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते लोक प्रत्येक प्रकल्प आणि गुंतवणुकीत फक्त त्यांच्या कुटुंबाचे हित पाहतात असे सांगून पंतप्रधानांनी तेलंगणच्या जनतेला सावधगिरीचा इशारा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी तेलंगणाची राजधानी हैदराबाद इथल्या परेड ग्राऊंड इथे ११,३०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली. या प्रकल्पांमध्ये हैदराबाद इथल्या बिबीनगर एम्सची पायाभरणी, पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास यांचा समावेश आहे. यावेळी, रेल्वेशी संबंधित इतर विकास प्रकल्पांचेही त्यांनी लोकार्पण केले. त्याआधी, पंतप्रधानांनी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांच्यातील साम्य नमूद करताना पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, जेव्हा घराणेशाही असते तेव्हा भ्रष्टाचार वाढायला सुरुवात होते. नियंत्रण हा परिवारवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणाचा मुख्य मंत्र आहे. अशा तत्त्वांवर टीका करत पंतप्रधान म्हणाले की, अशा राज्यकर्त्यांना प्रत्येक व्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण ठेवायचे असते आणि जेव्हा कोणी त्यांच्या नियंत्रणाला आव्हान देते, तेव्हा ते त्याचा तिरस्कार करतात. थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आणि देशभरात डिजिटल पेमेंटला दिले जात असलेले प्रोत्साहन यांचे उदाहरण देत पंतप्रधानांनी अशा घराणेशाहीकडे बोट दाखवले जे कोणत्या लाभार्थ्याला कोणता लाभ मिळेल यावर नियंत्रण ठेवतात. तसेच या परिस्थितीतून उद्भवणारे तीन अर्थ त्यांनी विशद केले. एक कुटुंबाचे गुणगान होत राहिले पाहिजे, दुसरा भ्रष्टाचाराचा पैसा कुटुंबाकडे येत राहिला पाहिजे आणि तिसरा गरीबांना पाठवलेला पैसा भ्रष्ट व्यवस्थेला मिळत राहिला पाहिजे. “आज मोदींनी भ्रष्टाचाराच्या या खऱ्या मुळावर हल्ला चढवला आहे. म्हणूनच हे लोक हादरले आहेत आणि जे काही केले जात आहे ते रागाच्या भरात केले जात आहे”, असे सांगत त्यांनी राजकीय पक्षांचा संदर्भ दिला ज्यांनी निषेध म्हणून न्यायालयात धाव घेतली मात्र त्यांनाच धक्का बसला.