
कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आता निर्णायक लढ्याची घोषणा करण्यात आली आहे.कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी बिंदू चौकात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने ‘पाच मिनिटं खंडपीठासाठी’ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जेलभरो आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. बिंदू चौकातील आंदोलनात मेणबत्ती लावून कृती समितीने खंडपीठ मागणीचा पुनरुच्चार केला.
आंदोलनासाठी विशेष उपस्थिती असलेल्या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोल्हापुरात खंडपीठ व्हावं, ही 40 वर्षांपासून मागणी आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाला न्यायमूर्ती नाहीत. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आधी मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक झाली पाहिजे. त्यानंतरच खंडपीठाबाबतचा ठोस निर्णय होऊ शकतो. नव्या मुख्यमंत्र्यांना या प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून दिली पाहिजे. खंडपीठ कोल्हापुरात होणे सर्वांच्या हिताचे आहे
आमदार सतेज पाटील यांनी खंडपीठ प्रश्नासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर बैठक घेण्यासाठी सूचना केली. मात्र, याला सर्वांकडून विरोध झाला. पालकमंत्री कोल्हापूरच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे सर्वांनी जाहीरपणे सांगितले. थेट मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयीची बैठक घेण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सतेज पाटील म्हणाले की, खंडपीठासाठी जे जे करणे आवश्यक होते ते सर्व महाविकास आघाडी सरकारने केले. आता पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन त्याबद्दलचा निर्णय होणे अपेक्षित आहे. या आंदोलनाच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील सर्व आमदारांची शुक्रवारी बैठक घेणार आहोत. या बैठकीत खंडपीठासाठी कशाप्रकारे पाठपुरावा करता येईल, याबाबतचे धोरण ठरवू.
या आंदोलनाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार पी. एन. पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश खडके, माजी अध्यक्ष अॅड. किरण गावडे, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे सदस्य अॅड. विवेक घाटगे, अॅड.शिवाजीराव राणे अॅड. महादेवराव आडगुळे, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पवार, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा वाशियांचे देखील अनेक वर्षापासून मागणी आहे